गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०२३

मी अन् तु

मी खवळलेला समुद्र, तू शांत किनारा

तु नीटनेटकं घर मी अस्ताव्यस्त पसारा. 

तु लयबद्ध पद्य मी रटाळ कथा

तु मनजोगी ईच्छा मी नाहक व्यथा

तु जुळलेला हिशोब मी सुटे पैसे

तु फस्ट क्लास फस्ट मी पास जैसे तैसे

मी साधी गरज तु जीवनावश्यक गोष्ट

मी अर्धवट वाक्ये तु संवाद सुस्पष्ट 

तु फुललेली बाग मी कबड्डीचे मैदान 

तु घनदाट वन मी ऊंचावरची मचान

मी लिंबुपाणी तु कोक

मी कचरता तु रोखठोक


- रुपेश तेलंग 

१० - ०७ - २०२३

सोमवार, १५ मे, २०२३

थोडं थोडं

तापल्या ऊन्हात गार वारं थोडं थोडं ।

थकल्या जीवला ही आधार थोडं थोडं ॥


फिकीर करतो रातं रातं दिन दिन ।

जागत्या मनाने ही विसावं थोडं थोडं ॥


डोक्याने चालते जग रहाटी हि सारी ।

विचारावे मत हृदयाला थोडं थोडं ॥


जगी सर्वसुखी असा आहे तरी कोण । 

भलं तुझं व्हावं व्हावं माझं थोडं थोडं ॥


पुन्हा चाकरी ती रोजनिशी पुन्हा ती ।

बेत रविवारचा आखावा थोडं थोडं ॥


- रुपेश तेलंग 

१५-०५-२०२३



श्यामरंग

रात्र होण्यासाठी

जरा अवकाश

झाले हे आकाश

श्यामरंग


अशी सांजवेळ 

यमुनेचा घाट

अडवितो वाट 

श्यामरंग


मटकी फोडाया

मारतोय खडे

गोपिकांसी छळे

श्यामरंग


गोपिका या सार्या 

रागावती कान्हा

छेड काढी पुन्हा 

श्यामरंग


हजर तो कृष्ण 

राधेच्या भेटीला

खेळी रासलीला

श्यामरंग


यशोदेचा पुत्र

सखा राधिकेचा

पति रुख्मिणिचा

श्यामरंग


वासुदेव हरि

गोविंद केशव

मुरारी माधव

श्यामरंग 


- रुपेश तेलंग

१४-०५-२०२३





मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०२३

सारंग तु

नभातला स्वैरवादी उडणारा पतंग तु
फुलांतुनी फुलणारे ना ना विध रंग तु
प्रभुचरणी अर्पिलेला अविट अभंग तु
महोदधी विहरणारा दर्या सारंग तु

सुरक्षा वलय तु परिवाराचे छत्र तु 
साध्य जग जरी मला अपेक्षा मात्र तु
वेळी पाठीशी राहणारा खरा मित्र तु
जेष्ठ पुत्र सुमित्रेचा स्वयं सौमित्र तु

- रुपेश तेलंग
१९-०२-२०२३




शनिवार, २१ जानेवारी, २०२३

रसिक हो !

रसिक हो ! सूर म्हणजे काय असतं.....  अं? 
काय असतं सूर...... ??


गायकाची भाषा असते सूर....... 

स्वरांचा पेशा असतो सूर...... 

कवितेतला गाशा असतो सूर...... 

विनोदातील हशा असतो सूर...... 

गंजलेल्या नैराष्यावरील उपाय असतं......


रसिक हो !  सूर म्हणजे काय असतं.....  अं?



- रुपेश तेलंग 

२१ - ०१ - २०२३


रविवार, १५ जानेवारी, २०२३

तेच सुर

छेडून पहावे पुन्हा तेच सुर

मनाशी वहावा भावनांचा पुर ॥


सुजाण सुशील सुमती म्हणुन

स्वतःशी जपावा स्वतःचा कसूर ॥


उणिवा ऊगाळत ऊगा जगावे

मना सलणारे व्यर्थ ते काहुर ॥


आवडते जे जे उराशी धरावे 

जे मना विरुद्ध सरावे ते दुर ॥


- रुपेश तेलंग

१५-०१-२०२३


मी अन् तु

मी खवळलेला समुद्र, तू शांत किनारा तु नीटनेटकं घर मी अस्ताव्यस्त पसारा.  तु लयबद्ध पद्य मी रटाळ कथा तु मनजोगी ईच्छा मी नाहक व्यथा तु जुळलेला ...