शुक्रवार, १९ डिसेंबर, २०१४

रुपलक्ष्मी

गोजिरे ते मुख
दर्शनी चैतन्य
सौंदर्य लावण्य
परी सम…!

सतेज सखोल
डोळे पाणिदार
तिखट किनार
भुवयांची…!

गोबरेसे गाल
ढळलेली बट
दातांमधे बोट
धरलेले…!

अल्लडपणाची
आकृती सजिव
तुझ्याशी हा जीव
जुळलेला…!

वलयधारीणी
तुच रुपलक्ष्मी
तुझिया सवे मी
दास तुझा…!

- रुपेश तेलंग
१३-०२-२०१४

शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०१४

मस्त पावसाची सर

रंग कमानी नभात
वायुसंगे फिरे गात
ओलावली फुल पात
तुझ्या अनोख्या रंगात

वर ढगांचा पसारा
त्यात झोंबणारा वारा
तरी ना पडे पाऊस
तुझ्या डोळ्यांचा दरारा

झाला पाऊस अधीर
पडे थळी सैरभैर
भिजवले सारे विश्व
नाही कुणाचीच गैर

झरझर झरझर
मस्त पावसाची सर
उगा शिऊनीया गेली
तुझ्या ओठांची किनार

- रुपेश तेलंग
२६-०९-२०१४

बुधवार, २४ सप्टेंबर, २०१४

नको जाऊ सोडून...

अताशा कुठे पास आलीस माझ्या
नको जाऊ सोडून तान्ह्या जीवाला ।
बहाणी पुरे, कारणे ही पुरे ती
सहवास तुझा हा हवा जगण्याला ॥

बोलणे तुझे ते लळा लावीसी ग
शब्दांनी तुझ्या गुंफिली स्वरमाला ।
तुझे आसणे ही जणु मेजवानी
तुझ्या नसण्याने जणु रिक्त प्याला ॥

श्रृंखला तुटोनी माणिके गळावी
तुझ्या आसवांची ना किंमत तुला ।
खळीने त्या रोज प्राजक्त फुलतो
का कारणं नसे तुझ्या हसण्याला ॥

- रुपेश तेलंग
२४-०९-२०१४

बुधवार, २० ऑगस्ट, २०१४

चांदणे...

चांदणे... फुलते तुझ्या हासण्याने
मन हे... चळते तुझ्या असण्याने
आसवे... ढळती तुझ्या विरहाने
रुप हे... तुझे असे गोजिरवाणे

पाहणे...  भ्रमीत दाही दिशा
बोलणे... सुरेची मादक नशा
केश हे... जणू गर्द काळी निशा
चालणे... करी जीवाचीही दशा

पाकळ्या... दले ही या तुझ्या ओठांची
मोकळ्या... नभी छटा तुझ्या केसांची
सगळ्या... मना तुच राणी जीवाची
वेगळ्या...  अदा नेई ओळख जगाची

- रुपेश तेलंग
२३-०८-२०१४

सोमवार, १८ ऑगस्ट, २०१४

तुझा कप...

जेव्हा दोन्ही हातांच्या ओंजळीत पकडशील
तेव्हा ती उब तुला माझी आठवण देईल
जवळ नेऊन ओठांचा स्पर्श करशील
तेव्हा माझ्या स्पर्शाची आठवण होईल
जेव्हा त्यातल घोटभर पिशील
तेव्हा तो घोट घोट गोडवा तुझ्या आयुष्यात विरेल
तळाशी न विरघळलेली साखर पाहशील
ते असेल संचित आपल्या प्रेमाच

- रुपेश तेलंग
१६-०८-२०१४

बुधवार, ६ ऑगस्ट, २०१४

दव

दव थेंबांनी घ्यावा तुझा गोडवा
रुळावे खिळावे तुझ्या ओठूशी
वृक्षास तो विळखा जसा वेलीचा
मजला तुझी ती मिठी सैलशी

रविवार, १३ जुलै, २०१४

शब्द माझे

जरा शब्द माझे
मलाच सुचूदे
तुझ्या आठवांनी
सारेच भुलले

सरी पावसाच्या
भिजवता अंग
अन ओठी तुझ्या
हसू हे खुलले

कधी सप्तरंगी
वा मंदाकिनी ही
तुला पाहताना
नभ ही चळले

- रुपेश तेलंग
१३-०७-२०१४

शुक्रवार, २५ एप्रिल, २०१४

मन ( असेही )

मन कोंदट कोंदट
बसे उगाच भांडत
मनापरी नाही होत
शब्द दाटते कंठात

मन उदास उदास
कुणी नाही आसपास
एकटाच जीव माझा
धरी निराशेची कास

मन अबोल अबोल
नेई जीवा खोल खोल
होते जगणे कठीण
जणू अंतरीची सल

मन नाजूक नाजूक
कसलीशी धाकधुक
नाही जाण कसलीच
विसरावी तान्ह भुक

- रुपेश तेलंग
२५-०४-२०१४

मन

मन पागल पागल
माझे नाही आजकाल
काय कसे कोण जाणे
मनी न्यारी हलचल

मन सारंगी सारंगी
वाजे सुर अंतरंगी
गोड स्वरात या त्याच्या
रुप झाले बहुरंगी

मन मोकळे मोकळे
नाही त्याला आढे वेढे
जणू शर्यतीची धुंद
मन सैरावैरा पळे

मन लहान लहान
कुशी निजलेले छान
त्याचे स्वतंत्रसे विश्व
या विश्वाशी अजाण

-रुपेश तेलंग
२५ -०४ -२०१४

गुरुवार, ३ एप्रिल, २०१४

सडा चांदण्याचा

ऊडत्या केसांवरी हा सडा चांदण्याचा
नच करु तु प्रयास उगा बांधण्याचा ॥

चंद्र ही लाजूनी पाठमोरा उभा
गुणगुणे गार वार्याची कानी सभा
केश मत्त हे जसा फाया फुलांचा
नच करू तु प्रयास उगा बांधण्याचा॥

निशा ही निराळी तराणेसे गाई
मंद तेजात सुंदर तुझी तरूणाई
जाणीले मी हा काळ मेळ साधण्याचा
नच करू तु प्रयास उगा बांधण्याचा ॥

- रुपेश तेलंग
२-४-२०१४

बुधवार, १९ मार्च, २०१४

सूर

एकदा भेट झाली की
ओळखीचा रंग फुलतो
उलगडत जाणारं नातं
सोबतीचा अर्थ बनतो

आयुष्याची उर्वरीत पाने
आपोआप जोडली जातात
फुलणार्या नवीन नात्याला
निरभ्र करून जातात

वाटेला आलेल्या रंगांचा
अनाहत बेरंग होतो
सूर गवसण्याआधीच
आवाज पोरका होतो

- कल्याणी

सोमवार, १७ मार्च, २०१४

होळी निमित्ताने

होळी निमित्ताने
कवितेत दंग
मनातील व्यंग
शोधूया का

मग्न मीच आज
कोण्या विचारात
आवेश ओघात
कसल्याशा

माझेच मलाही
कळेनासे झाले
कोठे हे निघाले
मन माझे

मनात काहूर
माजलेले आहे
सर्वदुर पाहे
प्रतिबिंब

रोजची सवड
लाभेल कुणाला
आजच क्षणाला
जगूद्याकी

काय कोण जाणे
कधी का भेटले
निरस कुठले
तुम्ही सर्व

रुपेशचे काम
चारोळ्या करणे
आपण करावे
वाचायचे

कविता कराया
नाही कचरत
जातो मी रचत
शब्द शब्द

सुचावे विचार
असे नवे जुने
परी न मागणे
देवाकडे

- रुपेश तेलंग
१६-०३-२०१४

गुरुवार, १३ मार्च, २०१४

का हिरावले

दुःख अनावर झाल्यागत
नभ धाय मोकळून रडत आहे
काय हिरावले त्याचे कुणी
का असा तडफडत आहे

सुखाची स्वप्ने सुद्धा
आता याला बघवत नाही
ग्रासल्या तमेने आता
काजवे ही विझत आहे

का हरवला कवडसा
शेजारच्या पणतीतला
अश्रु रंजित नजर ही
का रोखली शुन्यात आहे

- रुपेश तेलंग
२-३-२०१४

मी अन् तु

मी खवळलेला समुद्र, तू शांत किनारा तु नीटनेटकं घर मी अस्ताव्यस्त पसारा.  तु लयबद्ध पद्य मी रटाळ कथा तु मनजोगी ईच्छा मी नाहक व्यथा तु जुळलेला ...