शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१३

मन गेले तिच्यापास

काळ हा थांबला, श्वास मंदावला
तिला झाडाआडून, पाहूनिया ।
बोलण्या आधी हा, शब्दही गोठला
मन गेले तिच्यापास, धावूनिया ॥ धृ ॥

फुले पालवी ही फुलपाखरे
तयाचे जणू हे सगे सोयरे
लट केसांची गालावरी रेटली
छेडण्यास हा वारा कसा भिरभिरे
शुभ्रसा मोती हा, या शिंपल्यातला
वाटे घालु गळा त्यास माळूनिया ॥ १ ॥

- रुपेश तेलंग
१६ -०८ - २०१३

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१३

सण सोनेरी सा

रत्न माणकांची रास
वरलक्ष्मीचा सोनेरी पसा।
लेउन मध्यम साज
त्यात एक गजरा छान सा ।
दिपावलीचे तेज हे
वलयांकीत केले जरासे ।
साजिरे दिव्य हे सारे
अन सोहळा हा असा ॥

आतिषबाजी नी रोषणाईचा
चंद्राचा ढगाआडून कानोसा।
पणती दिव्यांचा लखलखाट
फुलबाज्यांचा डौल साजेसा।
भुईचक्रांची वर्दळ, अन्
कुंडीतला मोहक फुलोरा।
वितभर जीव घेऊनी
आकाशबाण उडतो कसा॥

चकली ब्रम्हांडाचे वेढे
लाडू जणु ग्रहगोल।
चंद्रकोराची केली करंजी
अन् तबकडी अनारसा।
शेव चिवड्याचा पाऊस
शंकरपाळे जणु गारा ।
जेवणाचे पाहू की नंतर
आधी फराळाला तर बसा ॥

- रुपेश तेलंग
५-११-२०१३

सोमवार, २४ जून, २०१३

वर्षाऋतू

डोंगराची हवा
लागे गार गार
थेंबांचा हा वार
सुखदसा...

झाडे पाने फुले
हालती डोलती
मौजेत झुलती
वार्यासंगे....

शर्यती पळती
ढगांची ती रांग
दोनच फर्लांग
दुरवरी...

ओढे नद्या नाले
खळाळून वाहे
बरसत आहे
वर्षाराणी....

खुलवी खुशाल
पिसारा हा मोर
श्रावणा समोर
पाहूनिया....

- रूपेश तेलंग
१९-०६-२०१३

मंगळवार, २१ मे, २०१३

गजरा

पाहून  खिळता, चोरट्या नजरा
जेव्हा चंद्र माझा, माळतो गजरा

पसरून गंध, मोगरा फुलांचा
कसा श्वासाशी, खेळतो गजरा

न राहिला कुणी, सचेतनी, ध्यानी
कैफिने कैकांना, भाळतो गजरा

विसावतो स्वतः तिच्या केसांसवे
दुरून जीवाला जाळतो गजरा

- रुपेश तेलंग
०४-०५-२०१३

गुरुवार, ९ मे, २०१३

मोरपंखी

रुपेरी तराणे हवा मोरपंखी
तु लेउनी यावे छटा मोरपंखी

कपाळी अशा या रेखीव कमानी
नयनी नशिली कडा मोरपंखी

अलगद काया लहरी मौजेत
वाटे धरावे त्या करा मोरपंखी

गुंग मज करी स्वरांची स्वराली
कसा हा मिळावा गळा मोरपंखी

वळून बघावे बघून हसावे
घायाळ करते अदा मोरपंखी

- रुपेश तेलंग
०९-०५-२०१३

शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३

बुधवार, २० मार्च, २०१३

प्रयत्न

पाहिले मी तिला
हिरव्या रंगात
आनंद डोहात
न्हाह्लेली

नाजूकसे स्मित
केश काळेशार
नजरेचा वार
साहवेना

बोलण्यात तिच्या 
अदा आगळीक 
वाटे जवळीक 
साधाविशी

कालच्या सांजेला 
आली ती सजून
लाजली हसून 
बोलताना

तिच्या प्रतीक्षेचे
जाह्लेची यत्न
भेटीचे प्रयत्न
करावे का.?

- रुपेश तेलंग
१९ - मार्च - २०१३

मी अन् तु

मी खवळलेला समुद्र, तू शांत किनारा तु नीटनेटकं घर मी अस्ताव्यस्त पसारा.  तु लयबद्ध पद्य मी रटाळ कथा तु मनजोगी ईच्छा मी नाहक व्यथा तु जुळलेला ...