सोमवार, ८ सप्टेंबर, २०२५

महाश्वेता

गुलाबी साडीतली ती कोमल छटा,

खांद्यावर रुळत्या त्या रेशमी बटा 


हसण्यात तिच्या मधुर सुरांचे गंध,

आनंद सर्वत्र ती विखुरते मंद मंद 


गालांतले हसू वाऱ्याची झुळूक 

मानेत लचक, डोळ्यात चुणूक 

तिच्या चालण्यात लाजरी कळा 

कमनीय बांधा नि मोरपंखी गळा


नेटकी नेसलेली ती रेशमी साडी

लाघवी डोळे अन बोलण्यात गोडी


जन हे थबकती बघ तुला पाहता 

उदात्त निर्मल पावन तू महाश्वेता 


- रुपेश तेलंग 

०७-सप्टेंबर-२०२५

शनिवार, १२ जुलै, २०२५

फक्त व्हावी

 तुझ्या स्पर्शाला गुंतलेलं मन असं भारक्त व्हावी।

तुझ्या कुशीशी विसावणारी ओळख चिरंतक्त व्हावी॥


खुब मालुम आहे तुझ्या नजरेला साद घालणं।

तरी ती क्षणभर थांबणारी भावना स्पष्ट व्हावी॥


हरवलो मी जरी देते आधार, माझे सारे तम हरते।

जगाच्या मार्गी चालताना तुच माझी शक्त व्हावी॥


मला वाटते प्रेम मिळावे अगाध तुला या नशिबी।

माझ्याच छायेत हरवलेली प्रित ती व्यक्त व्हावी॥


मनीषा सारं पूर्ण होवो, मिळो तुला जे हवे ते।

प्रार्थना करतो देवचरणी, तू माझी फक्त व्हावी ॥


-  रुपेश तेलंग

१२-जुलै-२०२५

बुधवार, ९ जुलै, २०२५

जन्मदिवस

शुभेच्छा तुला

आभाळ भरून

असो हर क्षण 

आनंदाचा


मनिषा होऊ दे

पुर्ण सकलं 

मिळू दे सगळं

मनसोक्त 


प्रेम न् उल्हास

तो जवळ यावा

विकार तो जावा 

दूरवर 


आनंदी आनंद

दिवस हा नवा

गोजिरा व्हावा

जन्मदिन

 

- रुपेश तेलंग




गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२५

लाल लाल

लाल लाल 


डौलदार माद्दक मनमोहक केश

केसांमघे माळलेले फुल लाल लाल 


मंद मंद हवेतुन उडणारी लट 

लटेमागे गोबरेसे गाल लाल लाल 


नाकामध्ये नथ उगाचच मुरडत

नथीमध्ये चमकता खडा लाल लाल 


मऊ ओठांआड लपलेले जणू मोती 

हसुने फुलले मुखकमल लाल लाल 


एव्हरी घालते ती पोशाख नानारंगी 

सणावारी नेसलेला शालू लाल लाल 


सुखाचा हा आपुला संसार सप्तरंगी 

साजरा करूया हा सण लाल लाल 


- रुपेश तेलंग 

१३ फेब्रुवारी २०२५

गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०२३

मी अन् तु

मी खवळलेला समुद्र, तू शांत किनारा

तु नीटनेटकं घर मी अस्ताव्यस्त पसारा. 

तु लयबद्ध पद्य मी रटाळ कथा

तु मनजोगी ईच्छा मी नाहक व्यथा

तु जुळलेला हिशोब मी सुटे पैसे

तु फस्ट क्लास फस्ट मी पास जैसे तैसे

मी साधी गरज तु जीवनावश्यक गोष्ट

मी अर्धवट वाक्ये तु संवाद सुस्पष्ट 

तु फुललेली बाग मी कबड्डीचे मैदान 

तु घनदाट वन मी ऊंचावरची मचान

मी लिंबुपाणी तु कोक

मी कचरता तु रोखठोक


- रुपेश तेलंग 

१० - ०७ - २०२३

सोमवार, १५ मे, २०२३

थोडं थोडं

तापल्या ऊन्हात गार वारं थोडं थोडं ।

थकल्या जीवला ही आधार थोडं थोडं ॥


फिकीर करतो रातं रातं दिन दिन ।

जागत्या मनाने ही विसावं थोडं थोडं ॥


डोक्याने चालते जग रहाटी हि सारी ।

विचारावे मत हृदयाला थोडं थोडं ॥


जगी सर्वसुखी असा आहे तरी कोण । 

भलं तुझं व्हावं व्हावं माझं थोडं थोडं ॥


पुन्हा चाकरी ती रोजनिशी पुन्हा ती ।

बेत रविवारचा आखावा थोडं थोडं ॥


- रुपेश तेलंग 

१५-०५-२०२३



श्यामरंग

रात्र होण्यासाठी

जरा अवकाश

झाले हे आकाश

श्यामरंग


अशी सांजवेळ 

यमुनेचा घाट

अडवितो वाट 

श्यामरंग


मटकी फोडाया

मारतोय खडे

गोपिकांसी छळे

श्यामरंग


गोपिका या सार्या 

रागावती कान्हा

छेड काढी पुन्हा 

श्यामरंग


हजर तो कृष्ण 

राधेच्या भेटीला

खेळी रासलीला

श्यामरंग


यशोदेचा पुत्र

सखा राधिकेचा

पति रुख्मिणिचा

श्यामरंग


वासुदेव हरि

गोविंद केशव

मुरारी माधव

श्यामरंग 


- रुपेश तेलंग

१४-०५-२०२३





मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०२३

सारंग तु

नभातला स्वैरवादी उडणारा पतंग तु
फुलांतुनी फुलणारे ना ना विध रंग तु
प्रभुचरणी अर्पिलेला अविट अभंग तु
महोदधी विहरणारा दर्या सारंग तु

सुरक्षा वलय तु परिवाराचे छत्र तु 
साध्य जग जरी मला अपेक्षा मात्र तु
वेळी पाठीशी राहणारा खरा मित्र तु
जेष्ठ पुत्र सुमित्रेचा स्वयं सौमित्र तु

- रुपेश तेलंग
१९-०२-२०२३




शनिवार, २१ जानेवारी, २०२३

रसिक हो !

रसिक हो ! सूर म्हणजे काय असतं.....  अं? 
काय असतं सूर...... ??


गायकाची भाषा असते सूर....... 

स्वरांचा पेशा असतो सूर...... 

कवितेतला गाशा असतो सूर...... 

विनोदातील हशा असतो सूर...... 

गंजलेल्या नैराष्यावरील उपाय असतं......


रसिक हो !  सूर म्हणजे काय असतं.....  अं?



- रुपेश तेलंग 

२१ - ०१ - २०२३


रविवार, १५ जानेवारी, २०२३

तेच सुर

छेडून पहावे पुन्हा तेच सुर

मनाशी वहावा भावनांचा पुर ॥


सुजाण सुशील सुमती म्हणुन

स्वतःशी जपावा स्वतःचा कसूर ॥


उणिवा ऊगाळत ऊगा जगावे

मना सलणारे व्यर्थ ते काहुर ॥


आवडते जे जे उराशी धरावे 

जे मना विरुद्ध सरावे ते दुर ॥


- रुपेश तेलंग

१५-०१-२०२३


बुधवार, २८ डिसेंबर, २०२२

स्पर्श


स्पर्शास स्पर्शाची

अंमळ कामना

स्पर्शाने स्पर्शावी 

सहज भावना


स्पर्शाशी सांगवे 

गुढ मनीचे

स्पर्शून जाणावे 

गोप सुखाचे 

स्पर्श करी दुर 

उगाचा रुसवा

स्पर्शातून वाढे

सहृद ओलावा



- रुपेश तेलंग 
२८-१२-२०२२





रविवार, २४ जुलै, २०२२

उंबरठ्या पाशी

जरा केशरी अन् पिवळी जराशी, 

पुन्हा सांज यावी उंबरठ्या पाशी


सुखे सर्व सोयी मनोमीत मित्र, 

जणू आप्त सारे उंबरठ्या पाशी


ऊजळोनी यावे भले दीप लक्ष, 

असो पणती एक उंबरठ्या पाशी


ना ना फुलझाडे बहरावी फुलांनी, 

छोटीशी तुळशी उंबरठ्या पाशी


डौल हा देखणा दावी वैभव घराचे, 

सुरेख नक्काशी उंबरठ्या पाशी


सुख सारे मिळुदे सार्या मनिषा, 

नांदुदे लक्ष्मी उंबरठ्या पाशी


आयु्रारोग्य पत प्रतिष्ठा समृद्धी, 

सुखाचे दिवस हे उंबरठ्या पाशी


- रुपेश तेलंग

२४-०७-२०२२


शनिवार, १० जुलै, २०२१

तु


हळवी मवाळ लाघवी चपल

सुंदर सुजाण कुटुंब वत्सल 


चतुर चपखल आणि चंचल

प्रसन्न प्रफुल्ल जैसे कमल


फुलांसवे तु मत्त ऊमल

जुई जाई मोगरा बकुल 


तु नस्ता मन चलविचल 

तुजविण हे जगणे विफल


रुपेश तेलंग

१०-०७-२०२१

सोमवार, ९ जुलै, २०१८

पुन्हा पुन्हा

धुंद ती पुन्हा पुन्हा
छंद ते पुन्हा पुन्हा
तुला मला जोडणारे बंध ते पुन्हा पुन्हा

बोल ते पुन्हा पुन्हा
शांत ही पुन्हा पुन्हा
तुझ्यासवे भाव माझे स्तब्धसे पुन्हा पुन्हा

ओढ ती पुन्हा पुन्हा
प्रेम ते पुन्हा पुन्हा
स्पर्शाने थरथरती स्पंदने पुन्हा पुन्हा

शब्द ते पुन्हा पुन्हा
काव्य ते पुन्हा पुन्हा
सुर ताल ह्रदयीचे श्राव्य हे पुन्हा पुन्हा

क्षण ते पुन्हा पुन्हा
वेळ ती पुन्हा पुन्हा
तुझ्या माझ्या स्वप्नांचा मेळ ही पुन्हा पुन्हा

खुश तु पुन्हा पुन्हा
खुश मी पुन्हा पुन्हा
तुझ्या जीवनात यावा दिन हा पुन्हा पुन्हा 

- रुपेश तेलंग
१० - ०७ - २०१८

शनिवार, १० मार्च, २०१८

कधी कधी

कधी पाठमोरे ऊन कोवळेसे 
कधी मंद लहरीं झुळावी जरासी
कधी तो असे केहरवा भारलेला 
कधी संथ सुरभी ती वेणू सुराशी 

कधी तीव्र संवादी क्षोभक मारा 
कधी गोठे शब्द अबोल जगाशी
कधी वागणे धुंद बेधुंद मौजी
कधी स्थिर स्थावर माझे मनाशी 

कधी मालूम गोप तिन्हीलोकीचे
कधी भुलते काय घडले मघाशी 
कधी सांगी उपदेश नाना परीचे
कधी चुकतां मीच हसतो स्वत:शी 

कधी धीर गंभीर सावध वाचा 
कधी खुप नाजुक रुपे मनाशी 
कधी साथीला साजिरे विश्व सारे 
कधी शांत एकांत मी स्व:गुणाशी 

- रुपेश तेलंग
१०-०३-२०१८

बुधवार, ५ जुलै, २०१७

मर्हाटी साज

नऊवारी
नेसली आज
मर्हाटी साज
देखणा बाज
तुझ्या दर्शनी ग...

सागरा
दिसतसे खोल
तिखट से बोल
नी डावा कौल
तुझ्या लोचनी ग...

नयनांचा
नशिला प्याला
हीच मधुशाला
म रोध कशाला
आज पिऊ दे ग...

वळून ही
पाहते अशी
सुरी सोनकशी
जिवाला जशी
पार छेदते ग...

अंदाज हा
दावी कुणास
नी लावे आस
खुद्द मदनास
उगा भुलवी ग...

- रुपेश तेलंग
२४-१२-२०१३

शुक्रवार, १८ मार्च, २०१६

... तो वो तुम हो

पत्तों पर ओस की बुंद दिखे ... तो वो तुम हो
प्यारभरी कोई नब्ज लिखें  ... तो वो तुम हो

धुप में थंडी छांव मिले  ... तो वो तुम हो
भुले को अपना गांव मिले  ... तो वो तुम हो

माटी में पहला अंकुर सजे  ... तो वो तुम हो
दूर कहीं मधूर संतूर बजे  ... तो वो तुम हो

बहार में ही कुछ फुल मुरझा जाते है शायद 
पतझड में भी जो फुल खिलें  ... तो वो तुम हो

- रुपेश तेलंग
१८-०३-२०१६

शनिवार, २२ ऑगस्ट, २०१५

मनरमणी

॥ श्री रुपेश उवाच ॥

प्रसन्नवदना रसिका ललना मनरमणी
सुहासिनी सुखदात्री तु चैतन्यदाईनी

प्रगल्भ विचारयुक्तां स्फुट संवादिनी
सुमधुर मधाळ गोड पियुषरस वाणी

मुखचंद्र कोमल नाजुक तलमस्पर्शपाणि
सुगंधीत कुमारी तनु कस्तुरी सुवासिनी

सुंदर साज लेऊन गुंफली केशवेणी
दिसावा मीच या शांत शीतल लोचनी

छळवादी चंचल उडवित ओंजळ पाणी 
सखी प्रियतमा अर्धांगिनी तु मनमोहिनी

- रुपेश तेलंग
२२-०८-२०१५

शनिवार, २७ जून, २०१५

प्रेम व्यवहार

रुसवा फुगवा हा तर निव्वळ शिष्ठाचार
चालू आहे हा प्रेम व्यवहार .

शोधून विषय नवे जुने
मोजून आपले उणे दुणे
मांडून बाजू डावी उजवी
नाही कुठली सबब वाजवी
कधी मागे कुरकुर कधी थेट तक्रार
चालू आहे हा प्रेम व्यवहार .

कधी छळ कधी संथ सतावणी
अबोला कधी, कधी नुसती बतावणी
कधी तीळासम विषयाचे पिंजणे
कधी उगा शब्दांनीच झुंजणे
वैद्य लागे जेव्हा विना विकार
चालू आहे हा प्रेम व्यवहार .

दुरी कमी अन् जवळीक ज्यादा
सुःख दुख्खी सोबतीचा वादा
अगाध प्रेमात तीटभर राग
भेटीची ओढ मिलनाचा स्वाद
सर्व शब्दांच्या शेवटी मुकार
चालू आहे हा प्रेम व्यवहार .

- रुपेश तेलंग
२७- ०६ -२०१५

शुक्रवार, २२ मे, २०१५

मिलन

आभासी या मिलनास
साक्ष क्षितीजाची

अतृप्त आस अजुन
प्रेमी प्रेमीकेची

तु अनंत आभाळ नी
अगाध समुद्र मी

बरस माझ्यावर पुन्हा
थेंबाच्या रुपातुनी

- रुपेश तेलंग
२२-०५-२०१५

महाश्वेता

गुलाबी साडीतली ती कोमल छटा, खांद्यावर रुळत्या त्या रेशमी बटा  हसण्यात तिच्या मधुर सुरांचे गंध, आनंद सर्वत्र ती विखुरते मंद मंद  गालांतले हसू...