गुरुवार, १३ मार्च, २०१४

का हिरावले

दुःख अनावर झाल्यागत
नभ धाय मोकळून रडत आहे
काय हिरावले त्याचे कुणी
का असा तडफडत आहे

सुखाची स्वप्ने सुद्धा
आता याला बघवत नाही
ग्रासल्या तमेने आता
काजवे ही विझत आहे

का हरवला कवडसा
शेजारच्या पणतीतला
अश्रु रंजित नजर ही
का रोखली शुन्यात आहे

- रुपेश तेलंग
२-३-२०१४

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१३

मन गेले तिच्यापास

काळ हा थांबला, श्वास मंदावला
तिला झाडाआडून, पाहूनिया ।
बोलण्या आधी हा, शब्दही गोठला
मन गेले तिच्यापास, धावूनिया ॥ धृ ॥

फुले पालवी ही फुलपाखरे
तयाचे जणू हे सगे सोयरे
लट केसांची गालावरी रेटली
छेडण्यास हा वारा कसा भिरभिरे
शुभ्रसा मोती हा, या शिंपल्यातला
वाटे घालु गळा त्यास माळूनिया ॥ १ ॥

- रुपेश तेलंग
१६ -०८ - २०१३

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१३

सण सोनेरी सा

रत्न माणकांची रास
वरलक्ष्मीचा सोनेरी पसा।
लेउन मध्यम साज
त्यात एक गजरा छान सा ।
दिपावलीचे तेज हे
वलयांकीत केले जरासे ।
साजिरे दिव्य हे सारे
अन सोहळा हा असा ॥

आतिषबाजी नी रोषणाईचा
चंद्राचा ढगाआडून कानोसा।
पणती दिव्यांचा लखलखाट
फुलबाज्यांचा डौल साजेसा।
भुईचक्रांची वर्दळ, अन्
कुंडीतला मोहक फुलोरा।
वितभर जीव घेऊनी
आकाशबाण उडतो कसा॥

चकली ब्रम्हांडाचे वेढे
लाडू जणु ग्रहगोल।
चंद्रकोराची केली करंजी
अन् तबकडी अनारसा।
शेव चिवड्याचा पाऊस
शंकरपाळे जणु गारा ।
जेवणाचे पाहू की नंतर
आधी फराळाला तर बसा ॥

- रुपेश तेलंग
५-११-२०१३

सोमवार, २४ जून, २०१३

वर्षाऋतू

डोंगराची हवा
लागे गार गार
थेंबांचा हा वार
सुखदसा...

झाडे पाने फुले
हालती डोलती
मौजेत झुलती
वार्यासंगे....

शर्यती पळती
ढगांची ती रांग
दोनच फर्लांग
दुरवरी...

ओढे नद्या नाले
खळाळून वाहे
बरसत आहे
वर्षाराणी....

खुलवी खुशाल
पिसारा हा मोर
श्रावणा समोर
पाहूनिया....

- रूपेश तेलंग
१९-०६-२०१३

मंगळवार, २१ मे, २०१३

गजरा

पाहून  खिळता, चोरट्या नजरा
जेव्हा चंद्र माझा, माळतो गजरा

पसरून गंध, मोगरा फुलांचा
कसा श्वासाशी, खेळतो गजरा

न राहिला कुणी, सचेतनी, ध्यानी
कैफिने कैकांना, भाळतो गजरा

विसावतो स्वतः तिच्या केसांसवे
दुरून जीवाला जाळतो गजरा

- रुपेश तेलंग
०४-०५-२०१३

गुरुवार, ९ मे, २०१३

मोरपंखी

रुपेरी तराणे हवा मोरपंखी
तु लेउनी यावे छटा मोरपंखी

कपाळी अशा या रेखीव कमानी
नयनी नशिली कडा मोरपंखी

अलगद काया लहरी मौजेत
वाटे धरावे त्या करा मोरपंखी

गुंग मज करी स्वरांची स्वराली
कसा हा मिळावा गळा मोरपंखी

वळून बघावे बघून हसावे
घायाळ करते अदा मोरपंखी

- रुपेश तेलंग
०९-०५-२०१३

शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३

महाश्वेता

गुलाबी साडीतली ती कोमल छटा, खांद्यावर रुळत्या त्या रेशमी बटा  हसण्यात तिच्या मधुर सुरांचे गंध, आनंद सर्वत्र ती विखुरते मंद मंद  गालांतले हसू...