शुक्रवार, २५ एप्रिल, २०१४

मन ( असेही )

मन कोंदट कोंदट
बसे उगाच भांडत
मनापरी नाही होत
शब्द दाटते कंठात

मन उदास उदास
कुणी नाही आसपास
एकटाच जीव माझा
धरी निराशेची कास

मन अबोल अबोल
नेई जीवा खोल खोल
होते जगणे कठीण
जणू अंतरीची सल

मन नाजूक नाजूक
कसलीशी धाकधुक
नाही जाण कसलीच
विसरावी तान्ह भुक

- रुपेश तेलंग
२५-०४-२०१४

मन

मन पागल पागल
माझे नाही आजकाल
काय कसे कोण जाणे
मनी न्यारी हलचल

मन सारंगी सारंगी
वाजे सुर अंतरंगी
गोड स्वरात या त्याच्या
रुप झाले बहुरंगी

मन मोकळे मोकळे
नाही त्याला आढे वेढे
जणू शर्यतीची धुंद
मन सैरावैरा पळे

मन लहान लहान
कुशी निजलेले छान
त्याचे स्वतंत्रसे विश्व
या विश्वाशी अजाण

-रुपेश तेलंग
२५ -०४ -२०१४

गुरुवार, ३ एप्रिल, २०१४

सडा चांदण्याचा

ऊडत्या केसांवरी हा सडा चांदण्याचा
नच करु तु प्रयास उगा बांधण्याचा ॥

चंद्र ही लाजूनी पाठमोरा उभा
गुणगुणे गार वार्याची कानी सभा
केश मत्त हे जसा फाया फुलांचा
नच करू तु प्रयास उगा बांधण्याचा॥

निशा ही निराळी तराणेसे गाई
मंद तेजात सुंदर तुझी तरूणाई
जाणीले मी हा काळ मेळ साधण्याचा
नच करू तु प्रयास उगा बांधण्याचा ॥

- रुपेश तेलंग
२-४-२०१४

बुधवार, १९ मार्च, २०१४

सूर

एकदा भेट झाली की
ओळखीचा रंग फुलतो
उलगडत जाणारं नातं
सोबतीचा अर्थ बनतो

आयुष्याची उर्वरीत पाने
आपोआप जोडली जातात
फुलणार्या नवीन नात्याला
निरभ्र करून जातात

वाटेला आलेल्या रंगांचा
अनाहत बेरंग होतो
सूर गवसण्याआधीच
आवाज पोरका होतो

- कल्याणी

सोमवार, १७ मार्च, २०१४

होळी निमित्ताने

होळी निमित्ताने
कवितेत दंग
मनातील व्यंग
शोधूया का

मग्न मीच आज
कोण्या विचारात
आवेश ओघात
कसल्याशा

माझेच मलाही
कळेनासे झाले
कोठे हे निघाले
मन माझे

मनात काहूर
माजलेले आहे
सर्वदुर पाहे
प्रतिबिंब

रोजची सवड
लाभेल कुणाला
आजच क्षणाला
जगूद्याकी

काय कोण जाणे
कधी का भेटले
निरस कुठले
तुम्ही सर्व

रुपेशचे काम
चारोळ्या करणे
आपण करावे
वाचायचे

कविता कराया
नाही कचरत
जातो मी रचत
शब्द शब्द

सुचावे विचार
असे नवे जुने
परी न मागणे
देवाकडे

- रुपेश तेलंग
१६-०३-२०१४

गुरुवार, १३ मार्च, २०१४

का हिरावले

दुःख अनावर झाल्यागत
नभ धाय मोकळून रडत आहे
काय हिरावले त्याचे कुणी
का असा तडफडत आहे

सुखाची स्वप्ने सुद्धा
आता याला बघवत नाही
ग्रासल्या तमेने आता
काजवे ही विझत आहे

का हरवला कवडसा
शेजारच्या पणतीतला
अश्रु रंजित नजर ही
का रोखली शुन्यात आहे

- रुपेश तेलंग
२-३-२०१४

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०१३

मन गेले तिच्यापास

काळ हा थांबला, श्वास मंदावला
तिला झाडाआडून, पाहूनिया ।
बोलण्या आधी हा, शब्दही गोठला
मन गेले तिच्यापास, धावूनिया ॥ धृ ॥

फुले पालवी ही फुलपाखरे
तयाचे जणू हे सगे सोयरे
लट केसांची गालावरी रेटली
छेडण्यास हा वारा कसा भिरभिरे
शुभ्रसा मोती हा, या शिंपल्यातला
वाटे घालु गळा त्यास माळूनिया ॥ १ ॥

- रुपेश तेलंग
१६ -०८ - २०१३

महाश्वेता

गुलाबी साडीतली ती कोमल छटा, खांद्यावर रुळत्या त्या रेशमी बटा  हसण्यात तिच्या मधुर सुरांचे गंध, आनंद सर्वत्र ती विखुरते मंद मंद  गालांतले हसू...