बुधवार, २० ऑगस्ट, २०१४

चांदणे...

चांदणे... फुलते तुझ्या हासण्याने
मन हे... चळते तुझ्या असण्याने
आसवे... ढळती तुझ्या विरहाने
रुप हे... तुझे असे गोजिरवाणे

पाहणे...  भ्रमीत दाही दिशा
बोलणे... सुरेची मादक नशा
केश हे... जणू गर्द काळी निशा
चालणे... करी जीवाचीही दशा

पाकळ्या... दले ही या तुझ्या ओठांची
मोकळ्या... नभी छटा तुझ्या केसांची
सगळ्या... मना तुच राणी जीवाची
वेगळ्या...  अदा नेई ओळख जगाची

- रुपेश तेलंग
२३-०८-२०१४

सोमवार, १८ ऑगस्ट, २०१४

तुझा कप...

जेव्हा दोन्ही हातांच्या ओंजळीत पकडशील
तेव्हा ती उब तुला माझी आठवण देईल
जवळ नेऊन ओठांचा स्पर्श करशील
तेव्हा माझ्या स्पर्शाची आठवण होईल
जेव्हा त्यातल घोटभर पिशील
तेव्हा तो घोट घोट गोडवा तुझ्या आयुष्यात विरेल
तळाशी न विरघळलेली साखर पाहशील
ते असेल संचित आपल्या प्रेमाच

- रुपेश तेलंग
१६-०८-२०१४

बुधवार, ६ ऑगस्ट, २०१४

दव

दव थेंबांनी घ्यावा तुझा गोडवा
रुळावे खिळावे तुझ्या ओठूशी
वृक्षास तो विळखा जसा वेलीचा
मजला तुझी ती मिठी सैलशी

रविवार, १३ जुलै, २०१४

शब्द माझे

जरा शब्द माझे
मलाच सुचूदे
तुझ्या आठवांनी
सारेच भुलले

सरी पावसाच्या
भिजवता अंग
अन ओठी तुझ्या
हसू हे खुलले

कधी सप्तरंगी
वा मंदाकिनी ही
तुला पाहताना
नभ ही चळले

- रुपेश तेलंग
१३-०७-२०१४

शुक्रवार, २५ एप्रिल, २०१४

मन ( असेही )

मन कोंदट कोंदट
बसे उगाच भांडत
मनापरी नाही होत
शब्द दाटते कंठात

मन उदास उदास
कुणी नाही आसपास
एकटाच जीव माझा
धरी निराशेची कास

मन अबोल अबोल
नेई जीवा खोल खोल
होते जगणे कठीण
जणू अंतरीची सल

मन नाजूक नाजूक
कसलीशी धाकधुक
नाही जाण कसलीच
विसरावी तान्ह भुक

- रुपेश तेलंग
२५-०४-२०१४

मन

मन पागल पागल
माझे नाही आजकाल
काय कसे कोण जाणे
मनी न्यारी हलचल

मन सारंगी सारंगी
वाजे सुर अंतरंगी
गोड स्वरात या त्याच्या
रुप झाले बहुरंगी

मन मोकळे मोकळे
नाही त्याला आढे वेढे
जणू शर्यतीची धुंद
मन सैरावैरा पळे

मन लहान लहान
कुशी निजलेले छान
त्याचे स्वतंत्रसे विश्व
या विश्वाशी अजाण

-रुपेश तेलंग
२५ -०४ -२०१४

गुरुवार, ३ एप्रिल, २०१४

सडा चांदण्याचा

ऊडत्या केसांवरी हा सडा चांदण्याचा
नच करु तु प्रयास उगा बांधण्याचा ॥

चंद्र ही लाजूनी पाठमोरा उभा
गुणगुणे गार वार्याची कानी सभा
केश मत्त हे जसा फाया फुलांचा
नच करू तु प्रयास उगा बांधण्याचा॥

निशा ही निराळी तराणेसे गाई
मंद तेजात सुंदर तुझी तरूणाई
जाणीले मी हा काळ मेळ साधण्याचा
नच करू तु प्रयास उगा बांधण्याचा ॥

- रुपेश तेलंग
२-४-२०१४

महाश्वेता

गुलाबी साडीतली ती कोमल छटा, खांद्यावर रुळत्या त्या रेशमी बटा  हसण्यात तिच्या मधुर सुरांचे गंध, आनंद सर्वत्र ती विखुरते मंद मंद  गालांतले हसू...